Collections

इये मराठीचीये नगरी – मराठी भाषा दिवस

By  | 



मराठी भाषा दिवस हा दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केल्या जातो. मराठी कवि विष्णु वामन शिवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस पाळण्याची प्रथा सुरू झाली.

इये मराठीचीये नगरी !!!
‘मराठी माणुस’ म्हटलं की डोळ्यासमोर आपसूक एका लढवय्या, रांगड्या, सरळसोट माणसाची प्रतिमा डोळ्यासमोर उभे राहते.
शेकडी वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आलेल्या उद्योतन सूरी नावाच्या जैन मुनींनी तर तसा प्रत्यक्ष उल्लेख त्यांच्या जैन प्राकृत भाषेत केला आहे, ते म्हणतात “सुदृढ सावळे सहनशील, कलहप्रिय अभिमानी, दिले घेतले बोलती लढती मरहट्टे मैदानी”

फक्त उद्योतन सुरीच नव्हे तर ह्यू एन त्संग सारख्या चिनी प्रवाशाने सुद्धा मराठी माणसाच्या रांगड्या स्वभावाचे वर्णन केले आहे.

पण वरवर सह्याद्रीसारखा राकट दिसणारा हा मराठी माणुस अंतरंगी तितकाच मुलायम आहे. संत एकनाथ तर म्हणतात की ‘मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसें’!!!

कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे सापडलेला जवळपास 1100 वर्षांपूर्वीचा ‘श्री चामुंडराये करवीयले’ हा उल्लेख असलेला शिलालेख मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख मानला जातो. त्यामुळे मराठी भाषेच्या निर्मितीचा काळ हा त्याहून जुना असावा असा तर्क केला जातो.

इतिहासाच्या पानापानात मराठी माणसाने आपल्या शौर्याने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. पण तेवढेच योगदान गीत-संगीताला देखिल दिले आहे.

आदिकवी मुकुंदराज ह्यांनी ८०० वर्षांपूर्वी लिहिलेली ‘विवेकसिंधु’ ही रचना ज्ञात इतिहासातील सर्वात प्राचिन रचना मानली जाते. ह्या साहित्यसरितेत अमुल्य भर टाकण्याचे काम केले ते संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ने !!
त्यांच्या हरिपाठ आणि अमृतानुभवामधील काव्यरचनांच्या वर्षावात आज इतक्या वर्षांनींही मराठी माणुस चिंब भिजतो आहे.

एकीकडे संत ज्ञानदेव विश्वासाठी पसायदान मागत असताना दुसरीकडे संत नामदेवांच्या रचनांनी भाषा, धर्म, प्रांताच्या सीमा पार करत ‘गुरू ग्रंथसाहेबा’मध्ये स्थान मिळवत्या झाल्या. आजही पंजाबमधील घुमानच्या गल्लीबोळात नामदेवजीकी मुखबानीतील मराठी शब्द आसमंतात विहरत असतात. महाराष्ट्राची किर्तन परंपरा त्यांनी उत्तरेत रुजवली.

ह्या संत वाड्मयाने मराठी जनमानसाला एक अध्यात्मिक बैठक मिळवुन दिली. त्याच्या स्वभावाला आकार दिला. ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ म्हणणारे संत सावता माळी’ किंवा ‘आम्ही वारीक वारीक, करू हजामत बारीक’ म्हणणारे संत सेना न्हावी,’ प्रत्येकाला त्याच्या कार्यात परमेश्वराचा साक्षात्कार घडवून आणला.

संतकवींनी परकीय आक्रमणाच्या काळातही समाजाला नैतिक अधःपतनापासून अलिप्त ठेवले. संत एकनाथांच्या भारुडाने अनिष्ट परंपरा व चालीरितीवर आसूड ओढण्याचे काम केले तर छत्रपती शिवरायांचा स्वराज्यासाठीचा लढा सुरू झाला तेव्हा त्याची पायाभरणी संत तुकारामांच्या अभंगांनीच केली.
स्वराज्याचे स्वप्न साकार होताच समर्थ रामदासांनी ‘आनंदवनभुवनी’ साकारल्याचे आपल्या रचनेतुन सांगितले.

संत कवींची ही परंपरा पुढे पंत कवींनी चालू ठेवली. मोरोपंतांच्या आर्या, दासोपंताची पासोडी, याशिवाय वामन पंडित, रघुनाथ पंडित अशा अनेक पंतकवींनी मराठी काव्यक्षेत्रात स्वतःचे योगदान दिले.

दरम्यान मराठी योध्यानी आपल्या पराक्रमाने अटकेपार झेंडे लावले होते. त्याचे प्रतिबिंब मराठी साहित्यावर पडले आणि पोवाडा, शाहिरी, लावणी हे कलाप्रकार लोकप्रिय झाले.

शिवकाळातील अजानदासाचा पोवाडा ते पेशवेकाळात होनाजी बाळा, पठ्ठे बापूराव ह्यांच्या लावण्या म्हणजे मराठी समाजाचे बदलता आर्थिक-मानसिक स्तराचा प्रवास होता.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ किंवा ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा’ ह्या रचना आजही लोकप्रिय आहेत.

इंग्रज राजवटीच्या काळात ऑपेरा, सॉंनेटचे प्रयोग मराठीत सुरू झाले. अण्णासाहेब किर्लोस्करानी ‘संगीत शाकुंतलच्या’ माध्यमातून काव्य आणि नाटक ह्यांची सांगड घालून आधुनिक मराठी रंगभूमीचा पाया घातला. महात्मा फुलेंनी ‘विद्येविन मती गेली’ सारख्या रचनेतून शिक्षणाचे महत्व सांगितले तर बालगंधर्वांच्या ‘किचकवध’ सारख्या नाटकातील पदातून सुप्तपणे ब्रिटिशांविरुध्द जनमत तयार करण्याचे प्रयत्न झाले. केशवसुतांच्या ‘तुतारीने’ नव्या युगाची नांदी दिली.

स्वातंत्र्यालढ्यादरम्यान सावरकरांच्या ‘जयोस्तुते जयोस्तुते’ सारख्या रचनांनी क्रांतिकारकांना प्रेरणा दिली तर कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकारने’ स्वातंत्र्याचे रणशिंग फुकले.
बालकवी, बहिणाबाई, बा.भ.बोरकर, बा.सी.मर्ढेकर अशा अनेक कवींनी त्या काळात मराठी काव्यक्षेत्र समृद्ध केले.
तर दुसरीकडे नामदेव ढसाळ, बाबुराव बागुल, वामनदादा कर्डक ह्यांच्या विद्रोही काव्यरचनांनी वंचित-शोषित घटकांना स्वतःचा आवाज दिला.

अण्णाभाऊ साठेंच्या ‘माझी मैना गावावर राहिली’ या गीताने कामगारवर्गाचा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील सहभाग अधोरेखित केला. तर शाहीर अमर शेख, शाहीर साबळे ह्यांच्या महाराष्ट्रगीतांनी मराठी जनमानसाला आत्मभान दिले.

मराठी चित्रपटसृष्टीने सुद्धा गीत-संगीत क्षेत्रात प्रचंड मोठी मजल मारली.
भालजी पेंढारकरांच्या चित्रपटातुन पुन्हा शिवकाळ साकारत असताना ‘मराठी पाऊल पडते पुढे’ ही जाणिव झाली तर दुसरीकडे प्रभातच्या ‘लख लख चंदेरी तेजाच्या सारी दुनियेने’ जगभर मराठीचा डंका वाजवला.
अवघ्या मराठी मुलखाला आपल्या निर्व्याज विनोदातून खळाळून हसायला भाग पाडले पु. ल. देशपांड्यांनी. बहुरंगी, बहुढंगी, चतुरस्त्र व्यक्तिमत्व!! चित्रपट, नाटक, संगीत, लेखन अशा सर्व माध्यमातून महाराष्ट्राच लाडक झालेलं व्यक्तिमत्त्व.

गदिमा आणि बाबूजीच्या गीतरामायणाने भाषेची बंधने तोडत लोकप्रियता मिळवली.
तर जगदीश खेबुडकरांच्या लावण्यांनी ढोलकीची ताफ परप्रांतात देखिल घुमवली.

मंगेशकर कुटुंबियांची भक्तिगीते-चित्रपटगीते,
दादा कोंडकें-जयवंत कुलकर्णीची धमाल गाणी, अरुण दाते-यशवंत देवांची भावगीते,
अवधूत गुप्ते-मिलिंद इंगळेचे पॉप अलबम,
संदीप खरे- सलील कुलकर्णीची बालगीते,
अशोक पत्की – निलेश मोहरीरने संगीतबद्ध केलेली शिर्षकगीते ते थेट अजय-अतुलचे झिंगाट या सर्वांनी मराठी माणसाला समृद्ध केले आहे !!

या प्रचंड गीतसागरात एकही नाव विसरले जाणे म्हणजे पातकच !! एवढे वैविध्य व एवढा प्रचंड कालपट पाहून आपसूकच सुरेश भट लिखित आणि कौशल इनामदार यांनी स्वरबद्ध केलेलं हे अभिमान गीत ओठांवर येतं….
“लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी”

1 Comment

  1. Anu Amlekar

    March 16, 2020 at 10:45 pm

    अतिशय उत्तम माहितीपूर्ण लेख मराठी प्रगतीच. मला आश्चर्य मिश्रित कौतुक वाटलं हे वाचतांना आणि खूप आनंदही झाला. धन्यवाद गाणी तर छानच निवडली आहेत.

Leave a Reply

Share via